अकार्यक्षम व्यक्तींना पक्षात स्थान नाही   

खर्गे यांचा इशारा

अहमदाबाद : अकार्यक्षम व्यक्तींना पक्षात कोणतेही स्थान नाही, असा स्पष्ट इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. जे पक्षाच्या कामात मदत करत नाहीत, आपली जबाबदारी पार पाडत नाहीत; त्यांनी निवृत्ती घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.साबरमती नदीच्या तिरावर अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या ८४ व्या अधिवेशनात ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आदी उपस्थित होते.
 
भाजपने महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक अफरातफर करुन जिंकली, असा आरोप करताना खर्गे यांनी, अनेक पक्ष बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी करत आहेत. शिवाय, निवडणूक आयोगाची भूमिकादेखील संशयास्पद असल्याचे सांगितले.केंद्रातील सत्ताधारी भाजपकडून ५०० वर्षे जुने मुद्दे ध्रुवीकरणासाठी उपस्थित केले जात आहेत. त्यांना जाती-धर्मात सतत द्वेष हवा आहे. अशा घातक विचारसरणीचे कधीही समर्थन केले जाऊ नये, असेही ते म्हणाले. 
 
पक्ष संघटनेसंदर्भात कठोर भूमिका व्यक्त करताना खर्गे म्हणाले की, जे पक्षाच्या कामात मदत करत नाहीत त्यांना विश्रांतीची गरज आहे, जे आपली जबाबदारी पार पाडत नाहीत त्यांनी निवृत्त व्हावे. खर्गे यांच्या या विधानाचे पदाधिकार्‍यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.निवडणुकांत अफरातफर केला जात असल्याच आरोप करताना खर्गे यांनी, जगातील विकसित देशांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राऐवजी पारंपरिक मतदान प्रक्रिया अवलंबली आहे. पण, आमचा निवडणूक आयोग याची दखल घ्यायला तयार नाही. महाराष्ट्राच्या निवडणुकीत बनावट मतदार याद्या तयार करण्यात आल्या, असे सांगितले.
 
संघटन अधिक मजबूत करण्यासाठी जिल्हा अध्यक्षांच्या भूमिकेत आणखी वाढ करण्यात येईल. त्यांची नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या निर्देशानुसार निष्पक्ष आणि कठोरपणे केली जाईल, असेही ते म्हणाले. यापुढे उमेदवारांच्या निवडीत त्यांचे मत महत्त्वाचे ठरेल. जिल्हा अध्यक्षांना नियुक्तीच्या वर्षभरातच निष्कलंक व्यक्तींना पक्षाशी जोडण्याचे काम करावे लागेल. अशाच प्रकारे विविध पातळ्यांवर काम चालेल. यात कोणत्याही प्रकारचा पक्षपात केला जाणार नाही, असा विश्वासही खर्गे यांनी यावेळी व्यक्त केला.
 
काँग्रेस जिद्द, संघर्ष आणि समर्पणाचा संदेश घेऊन न्यायाच्या मार्गावर चालणार आहे. आम्ही पुन्हा एकदा स्वातंत्र्याचा लढा लढत आहोत. विषमता, भेदभाव, गरिबी आणि जातीयवादाविरुद्धचा हा लढा आहे, असे सांगत खर्गे म्हणाले की,  स्वातंत्र्याच्या या दुसर्‍या लढ्यात फरक एवढाच आहे की, पूर्वी परकीय लोक अन्याय, गरिबी आणि विषमतेला प्रोत्साहन देत होते, आता हे काम सरकार करत आहे. तेव्हा परकीय जातीयवादाचा फायदा घेत असत, आज सरकार त्याचा फायदा घेत आहे, असा आरोप त्यांनी केला. पण, ही लढाई आपण जिंकूच! असा विश्वास खर्गे यांनी व्यक्त केला.
 
मोदी सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी सरकारी मालमत्ता विकून लोकशाही हळूहळू संपवत असल्याचा आरोपही खर्गे यांनी यावेळी केला. खासगीकरणातून एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण संपवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. हे असेच चालू राहिले तर मोदी सरकार संपूर्ण देश विकून निघून जातील, असा आरोप त्यांनी केला.
 

Related Articles